धर्मावतार :
- अधर्म तथा दुष्ट शक्तींचा नाश करून धर्मस्थापना करण्यासाठी व सज्जनशक्ती प्रस्थापित करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार धारण केला.
- परम भक्तांचे संरक्षण व भगवत शक्तीचे सर्वाव्यापकत्त्व सिद्ध करणारा हा महान अवतार होय.
- भगवान विष्णुंच्या दशावतारांपैकी हा चौथा अवतार होय.
अवतार काल :
वैशाख शु. चतुर्दशी (संध्यासमय)
प्राचीन कथा :
- संदर्भ :-
श्रीमद्भागवतपुराण, श्रीविष्णुपुराण आदी ग्रंथांमध्ये या महान अवताराच्या कार्यकथेचे विस्तृत वर्णन प्राप्त होते.
- हिरण्यकश्यपू जन्म :-
ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादि ऋषि यांच्या शापामुळे श्रीनारायणाचे द्वारपाल “जय-विजय” यांना दैत्य कुळात तीन जन्म घ्यावे लागले.
हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू
रावण व कुंभकर्ण
शिशुपाल व वक्रदंत
- राक्षसी वृत्ती :-
हिरण्याक्ष – अति संग्रहीवृत्ती तर हिरण्यकश्यपू – अहंकार व भोगवृत्ती होय. यापैकी प्रथम दोन “हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू” यांचा उद्धार करण्याकरिता “वराह व नृसिंह” हे अवतार क्रमशः झाले.
- प्रल्हाद जन्म :-
आपली शक्ती वाढविण्यासाठी मंदराचल पर्वतावर तपश्चर्येस जाताना हिरण्यकश्यपूला “नारायण,नारायण” असे ऐकू आले. हा अशुभ शकून समजून तो महालात परतला आणि त्याच क्रोधात त्याचेकडून १०८ वेळा श्रीनारायणाचे नामचिंतन झाले आणि पुढे कयाधुच्या गर्भात प्रल्हादाची स्थापना झाली, जो पुढे महान विष्णूभक्त झाला.
- हिरण्यकश्यपुला वरदान :
पुढे ब्रह्मदेवाकडून या दैत्यास “तुला मृत्यू दिवसाही नाही व रात्रीही नाही, घरात नाही व बाहेर नाही, जड वस्तूने नाही व शस्त्र-अस्त्राने नाही, मनुष्याने नाही व पशुनेही नाही”, असे वरदान दिले.
- प्रल्हादाची शिक्षा व हिरण्यकश्यपुचा क्रोध :
प्रल्हादाला शुक्राचार्यपुत्र “शंड व अमर्क” यांनी राजनीती विषयक शिक्षा देण्यास ठेवले परंतु त्याने त्रिभुवनात श्रीहरीशिवाय इतर अस्तित्त्व अमान्य केले. परिणामी हिरण्यकश्यपु क्रोधीत झाला व सर्वत्र अधर्माचा उद्रेक झाला.
- श्रीनृसिंह प्राकट्य :-
अखेर एक दिवस क्रोधाने चराचरातील श्रीहरीला मारण्यासाठी या दैत्याने एका खांबाला लाथ मारली ज्यातून भगवान श्रीनृसिंह प्रकट झाले व सायंकाळी, उंबरठ्यावर, शस्त्राशिवाय (नखाने) या अधर्मी दैत्याचा उद्धार केला.
- अवतार कार्य :-
अशाप्रकारे आपल्या अवताराने धर्मस्थापना व भक्त संरक्षणाचे ब्रीद भगवंतांनी पूर्ण केले.
धर्मबोध :-
- सनत्कुमार क्रोधीत झाल्याने त्यांना भगवंताचे दर्शन झाले नाही, जय-विजयांच्या व्यवहार विषमतेमुळे ते शापित झाले, दितीच्या भेद्बुद्धीने पाप घडून तिच्या पोटी दैत्याचा जन्म झाला. थोडक्यात दैनंदिन जीवन जगताना काम-क्रोधादीवर नियंत्रण ठेवावे, भक्तीचा अंकुश ठेवावा व उचित आचार, विचार व व्यवहाराचे वर्तन करावे.
- भक्त प्रल्हादाने दैत्य महालात सर्वत्र ईश्वरास पाहिले व तेथे श्रीनृसिंह प्रकटले. मनुष्याने ईश्वराच्या सर्वव्यापकतेची भावना सदैव ठेवल्यास पापाचरणास जागा राहणार नाही व प्रत्येक घर वैकुंठ होईल.
- केवळ हिरण्यकश्यपु सारखे तप केल्याने भागत नाही तर प्रल्हादासारखे आपल्या तपः कर्मामागील भावना व हेतू शुद्ध असणे आवश्यक होय तरच कल्याण होईल.
- दुःखात व अतीव कष्टात आपले ध्येय (श्रीहरी) चे स्मरण व सेवा प्रल्हादाने सोडली नाही व आपल्या संगतीत आलेल्या सर्वांना आपले ध्येयदर्शनाचा (श्रीनृसिंह) लाभ करून दिला. तद्वत महान भक्त कठीण परिस्थितीत ध्येयाची कास न सोडता सर्वांना कल्याणाचा लाभ करून देतो व ‘सत्संगाचे’ महत्त्व सिद्ध करतो.
- महान धर्मभक्त प्रल्हादाला बालवयातच मातेकडून धर्म मार्गाचा उपदेश झाला, थोडक्यात धर्मकार्याच्या विस्तृत वृक्षाचे मूळ हे बालवयात होणारे धार्मिक संस्कार होत.
- येथे दैत्य योनीतील जय-विजयांचा उद्धार झाला म्हणजेच ईश्वराच्या शिक्षेतही करूणा व कल्याण असल्याचे लक्षात येते.
- कथेवरून असे लक्षात येते कि, भगवत्प्राप्ती वा आपले उचित ध्येय प्राप्त करण्यासाठी संपत्ती, विद्वत्ता, वय, उच्च कुलाची आवश्यकता नसून योग्य हेतू, निश्चल वृत्ती तसेच प्रामाणिक व शुद्ध प्रेमाची आवश्यकता होय.
|| श्रीनृसिंह भगवान की जय ||
पौराणिक कथानकातून जीवनावश्यक दृष्टिकोनही विशद केलात. हे अत्यंत उपयोगाचे व नवदृष्टी देणारे आहे.
Very informative.
सुंदर script एकदा वाचून लक्षात रहाण्यासारख
Very informative and aptly exploiting the truth and purpose of human life to achieve the divine goal.