अधिकमास म्हणजे काय ?
असंक्रान्तिरमांतोयो मासश्चेत्सोधिमासकः | मलमासाद्वयोज्ञेयः प्रायश्चैत्रादिसप्तासु ||
द्वात्रिम्शद्भिर्गतैर्मासैर्दिनैः षोडशभिस्तथा | घटिकानां चतुष्केण पतत्यधिकमासकः ||
थोडक्यात भारतीय कालगणनेनुसार चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे व सौरवर्ष हे ३६५ दिवसांचे असते. यामध्ये ११ दिवसांचा फरक दिसून येतो. ही गती भरून काढून दोहोंचा मेळ घालण्याकरिता साधारणतः ३२ महिन्यानंतर ‘अधिकमास’ होतो. म्हणजेच हा तिसऱ्या वर्षी येतो. चैत्र ते आश्विन असे सात महिने यामध्ये येतात तर क्वचित फाल्गुन सुद्धा येतो.
मलमास म्हणजे काय ?
प्राचीन मान्यतेनुसार विश्वाचे कल्याण व अकल्याण हे येथे होणाऱ्या सत्कर्म आणि दुष्कर्मांवर अवलंबून असते. यातील दुष्कर्माचे प्रमाण वाढल्याने बाराही महिन्यांचा पापभार हा वाढीस गेला, त्यातील तिसरा हिस्सा बाहेर काढून हा तेरावा अधिकमास निरामान झाला आणि म्हणूनच यास ‘मलमास’ असे नाव पडले.
पुरुषोत्तममास म्हणजे काय ?
- या अधिकमासाला गोलोकाधीपती भगवान श्रीकृष्णाने स्वतःचे नाम देवून भूषविले म्हणूनच यास ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हणतात. आणि म्हणूनच सातत्याने या महिन्यात धर्माचरण केल्याने अधिक सत्कर्म फलप्राप्ती होते असेही सांगण्यात येते.
- म्हणूनच या काळात संपूर्ण शाकाहार धारण करून परद्रोह, परनिंदा, क्रोध, कपट, अभक्ष्य भक्षण यांचा त्याग करावा.
व्रताचरण
व्रताचरणाचा भाग म्हणून या महिन्यात विविध नियमांचे पालन केले जाते. जसे, एकभुक्त व्रत, फलाहार व्रत, एकांती व्रत, अयाचित वृत्तीने आहार, प्रतिदिन मुठभर धान्यदान, नित्य अभ्यंग स्नान, तेल-तूप इ. दीपपूजन, वेश न ओलांडणे, अनवाणी चालणे, मौनव्रत, केवळ भूमीवर निद्रा (चटईवर झोपणे) आदी व्रतनियमांचे पालन दिसून येते.
अधिकामासाचे वैशिष्ट्य
- ३३ या संख्येत बत्तासे, अनारसे, खारका, सुपाऱ्या, फळे आदींचे दान दिले जाते.
- “अधिकमास माहात्म्य” या ग्रंथाचे विधियुक्त पारायण केले जाते.
- गर्भाधानापासून अन्नप्राशनापर्यंतचे आठ संस्कार हे अधिक मासात करता येतात तसेच प्रतिमासात येणारी धार्मिक कृत्ये देखील अधिकमासात करता येतात.
- विशेषतः रामायण, भगवद्गीता, विष्णुसहस्रनाम, श्रीरामरक्षा, श्रीमद्भागवत इत्यादी विविध ग्रंथांचे वाचन, पठण आदी या महिन्यात केले जाते.
अधिकमासातील पाच पुण्यपर्वे व कृत्ये
- वैधृती योग :- या योगावर विष्णुसहस्रनामाचे १६ पाठ करून १६ विडे दान दिले जातात.
- व्यतिपात योग :- धान्य, सुवर्ण आदींचे ताटामध्ये १३ च्या संख्येत फळे दान केली जातात.
- पौर्णिमा :- विधियुक्त श्रीराधाकृष्णाचे पूजन करून अन्न, वस्त्रादिंचे दान केले जाते.
- अमावस्या :- तर्पण विधी संपन्न करून ‘तिलपात्राचे’ दान केले जाते.
- द्वादशी :- या तिथीवर तीर्थस्थानी पूजा संपन्न करून दान केले जाते.
मासांती (महिन्याच्या अखेरीस) केले जाणारे दान
- गरिबांना पादत्राणे, गादी, चादर, पांघरूण आदींचे दान द्यावे.
- दीनदुबळ्या, आजारी, भुकेलेल्या लोकांना ‘अन्नदान’ करावे.
- गोमातेस चारा आदी द्यावे.
- ‘ओम राधिकापुरुषोत्तमाभ्यां नमः|’, या मंत्राचा दररोज जप करावा व ती माळ कृष्णभक्तास दान द्यावी.
- अधिकामासाचे उद्यापन असल्यास समईसह पुरोहितास वायनदान करावे.
नित्य प्रार्थना
अधिकमासात मुख्यत्वे पुरुषोत्तम देवतेची आराधना व पूजन केले जाते. ज्यामध्ये पंचसुक्त पवमान, विष्णुसहस्रनाम, वैदिक विष्णुसूक्त, पुरुषसुक्त वा पुढील पुरुषोत्तम स्तोत्राचे दररोज नित्य पठण करावे.
|| पुरुषोत्तम स्तोत्र ||
ॐ नमः पुरुषोत्तमाख्याय | नमस्ते विश्वभावन | नमस्तेस्तु हृषीकेशी | महापुरुष पूर्वज ||१||
येनेदमखिलं जातं | यत्र सर्वं प्रतिष्ठितं | लयमेष्यति यत्रैतत् | तं प्रपन्नोस्मि केशवम् ||२||
परेशः परमानन्दः | परात्परतरः प्रभुः | चिद्रुपश्चित्परिज्ञेयो | स मे कृष्णः प्रसीदतु ||३||
कृष्णं कमलपत्राक्षं | रामं रघुकुलोद्भवं | नृसिंहं वामनं विष्णुं | स्मरत्यदि परां गतिं ||४||
वासुदेव वराहं च | कंस केशी निषूदनं | पुराणपुरुषं यज्ञपुरुषं | नित्यं प्रणतोस्म्यहं ||५||
अनादिनिधनं देवं | शङ्खचक्रगदाधरं | त्रिविक्रमं हलधरं | प्रणतोस्मि सनातनम् ||६||
य इदं कीर्तयेन्नित्यं | स्तोत्राणामुत्तमोत्तमं | सर्वपापं विनिर्मुक्तो | विष्णुलोके महीयते ||७||
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
अतिशय सुंदर लिखाण
खूप सुंदर माहिती दिली आहे. नवीन पिढीला मार्गदर्शन होईल.
फारच छान व सुंदर माहिती दिली आहे त्या प्रमाणे अधिक मास साजरा करण्याचा प्रयत्न करेल
धन्यवाद आपला धनंजय बनसोड अमरावती.
अतिशय सुंदर माहीती, अधिकमासात अधिकाधीक पुण्यसंचय करण्याचा प्रयत्न आम्ही कुटूंबीय करु.आपले खुप खुप आभार.
फारच सुंदर माहिती.
अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद
उपयुक्त माहिती आणि विष्णू आराधना करण्याची प्रेरणा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
अधिकमास व्रतसंकल्पना स्पष्ट करणारी माहिती. सर्वांसाठी मार्गदर्शक.
चांगली माहिती मिळाली.
खूप उपयुक्त माहिती दिल्यामुळे यंदाचा अधिकमास धर्मशास्त्रा प्रमाणे साजरा करता येईल. धन्यवाद.
खरचं खूप छान माहिती मिळाली… धन्यवाद🙏🙏
खुप छान व उपयुक्त माहिती आहे.अधिक महिन्याचे व्रत करायला सर्वांना खुप मदत होईल.
खूप उपयक्त महिती दिल्याबदद्ल अनेक अनेक धन्यवाद.