व्रताचे नाव : अक्षय्य तृतीया
व्रत तिथी : वैशाख शुद्ध तृतीया
वैशाख शुक्लपक्षेतु तृतीया रोहिणीयुता | पूर्वाण्ह व्यापिनी ग्राह्या परायदि दिनद्वये ||
दुर्लभा बुधवारेण सोमेनापि युतातथा | रोहिणी बुधयुक्तापि पूर्वविद्धा विवर्जिता ||
अर्थात,
- वैशाख शुद्ध तृतीयेला केलेले दान अक्षय्य राहते म्हणून या तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हणतात.
- रोहिणी नक्षत्र तसेच सोमवार / बुधवार या योगांनी युक्त असेल तर हा पुण्यकारक योग होतो.
- अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.
अक्षय्य तृतीया कोणी करावी ?
अक्षय्य सुखाची अपेक्षा प्रत्येकालाच असते म्हणून आपआपल्या घरी प्रत्येकाने अक्षय्य तृतीयेला घटाची पूजा करावी. मोठया घरी होते, वडील करतात म्हणून कृपया टाळू नये. याचा केवळ पितृश्राद्ध आदी विधींशी संबंध आहे, असे नाही.
विधी
- या दिवशी मातीचा कुंभ आणून देवता व पितर यांना उद्देशून (एक किंवा दोन) त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात.
- शुचिर्भूत होवून आचमन, प्राणायाम आदी करून पुढील प्रमाणे संकल्प सोडावा:
श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं, श्रीवसन्तमाधवदेवताप्रीत्यर्थं पितृप्रीत्यर्थं च उदकुम्भ दानं अहं करिष्ये ||
- देवकार्य संबंधाने प्रत्येकाने कुंभाला सुताने वेष्टन करून, त्यामध्ये गंध, फुल, सुपारी-नाणे टाकून त्यांचे यथोपचार पूजन करून त्यामध्ये अक्षता रुपी गहू वाहावे.
- यानंतर पुरोहिताचे पूजन करून पुढील मंत्राने उदककुंभदान करावे,
एष धर्म घटो दत्तो ब्रह्माविष्णू शिवात्मक : | अस्यप्रदानात्सकला मम संतु मनोरथा : ||
- या श्लोकाचे उच्चारण करून घरातील प्रत्येकाने गव्हाच्या अक्षता घटावर वाहाव्यात.
- पितृ तृप्ती हेतूने ज्यांना माता,पिता नाहीत त्यांनी प्रथम गहू व नंतर काळे तीळ अर्पण करावे.
- यानंतर पुढील मंत्राने उदक कुंभदान करावे.
एष धर्म घटो दत्तो ब्रह्माविष्णू शिवात्मक : | अस्य प्रदानात् तृप्यंतु पितरोsपि पितामहा : ||
गंधोदक तिलैर्मिश्रं सान्नंकुंभं फलान्वितम् | पितृभ्य: संप्रदास्यामि अक्षय्य मुपतिष्ठतु ||
- कुंभासमोर आपल्या कुलाचाराप्रमाणे नैवेद्य अर्पण करावा.
- सर्वसाधारणपणे शेवया, पापड, कुरडया, चिंचोणी, पन्ह इत्यादी पक्वान्न करून नैवेद्य अर्पण केला जातो.
- पुरोहितास यथाशक्ती दक्षिणा द्यावी व या दिवशी दान करावे.
- सामान्यतः सातू-गूळ, खरबूज, आंबा इत्यादी वस्तू दान केल्या जातात.
- यादिवशी जे काही जप, होम, तर्पण, दान आदी केले जाते ते सर्व अक्षय्य होते.
महत्व
- शेतकरी बांधव या मुहूर्तावर कृषी कार्यास सुरुवात करतात.
- बरेच ठिकाणी चैत्र शुक्ल तृतीयेला चैत्रागौरीचे आवाहन केले जाते. या व्रताची समाप्तीही या दिवशी करतात.
- या शुभमुहूर्तावर केलेले शुभ कार्य हे ‘अक्षय्य’ म्हणजेच अखंड / सातत्याने चालत राहते तसेच त्याचे अक्षय्य फल प्राप्त होते.
अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं। तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया॥
उद्दिष्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यैः। तत् च अक्षयं भवति भारत सर्वमेव॥
- श्रीविष्णु चे अंश भगवान श्रीपरशुरामांनी याच दिवशी श्रीरेणुका मातेच्या उदरी अवतार घेतला म्हणून म्हणून या तृतीयेला विशेष महत्त्व आहे.
- भविष्यपुराणानुसार या तिथीला युगादी तिथी (सत्ययुग व त्रेतायुग प्रारंभ तिथी) असेही म्हटले जाते.
खूप महत्त्वाची माहिती आहे.अक्षय तृतीया चे महत्त्व कळले.