वामन जयंती

  • व्रताचे नाव : वामन द्वादशी व्रत
  • व्रत  तिथी:  भाद्रपद शु. द्वादशी
    भागवतपुराण, अष्टम स्कंध नुसार भाद्रपद शु. द्वादशीला माध्यान्ह काळी श्रवण नक्षत्रावर ‘वामन अवतार’ झाला, म्हणून यादिवशी हे व्रत करतात.

इयमेव श्रवण द्वादशी तत्रेकादश्यां श्रवण योगे सैवो पोष्या |
एकादशी द्वादशी च वैष्णव्यमपि तत्रचेत् |

तद्विष्णुशृंखलंनाम विष्णुसायुज्यकृद्भवेत ||

भगवान वामनाचे संदर्भ

  • हा विष्णुच्या दशावतारातील पाचवा व भागवत पुराणानुसार (१.३.१९) १५ वा अवतार म्हटला जातो.
  • इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदं |”, या ऋग्वेदातील (१.२२.१७) ऋचेत याचा अस्पष्ट उल्लेख येतो.
  • तैत्तिरीय संहितेत (२.४.१२.२.) मध्ये या अवताराचा उल्लेख येतो.
  • शतपथ ब्राह्मणात (१.२.२.१-५) वामन कथेचा संदर्भ येतो.
  • अदितीनेकेशवतोषण” नामक व्रत केले आणि कश्यप-अदिती यांना भगवान वामनाच्या रुपात पुत्रप्राप्ती झाल्याचा उल्लेख भागवत पुराणात (८.१८.५-६) येतो.

व्रताचा विधी

  • द्वादशीला सकाळी नद्यांच्या संगमावर यथाविधी स्नान करतात आणि तिथल्या जलाने मंत्रपूर्वक घट भरून आणतात.
  • नंतर त्यात पंचरत्ने घालून त्याची शिंक्यात स्थापना करतात.
  • माध्यान्ह उलटल्यावर पूजेचा संकल्प आणि घटाची स्थापना करतात आणि त्यावर सुवर्ण, चांदी, काष्ठ किंवा वेळूचे पूर्णपात्र भरून ठेवतात.
  • एक आढक (४ शेर) तीळ, यव किंवा गहू घेवून त्याच्या राशीवर कोऱ्या वस्त्राने (काही ठिकाणी अजिनाने) वेष्टीलेली जनार्दनस्वरूपी वामनाची सुवर्णप्रतिमा ठेवतात.
  • प्रतिमेच्या पुढे दंड, कमंडलू, छत्र, पादुका, अक्षमाला इ. ठेवून त्याचे षोडशोपचार पूजन करतात.
  • यानंतर त्याला विशेष अर्घ्य (गंध, अक्षत, फुल पळीभर जलाने सोडणे) दिला जातो.

अर्घ्यमंत्र

नमस्ते पद्मनाभाय नमस्ते जलशायिने | तुभ्यमर्घ्यं प्रयच्छामि बालवामन रूपिणे ||

प्रार्थना

अजिनदण्डकमण्डलुमेखला रुचिरपावनवामन मूर्तये |
मितजगत् त्रितयाय जितारये निगमवाक्पटवे बटवे नमः ||

अर्थ – अजिन, दंड, कमंडलू, मेखला यांनी ज्याची मूर्ती शोभित आहे. ज्याने त्रैलोक्य व्यापले आहे, शत्रू जिंकला आहे आणि जो वेदवाणीत पटू आहे, अशा बटू वामनाला नमस्कार असो

  • त्या रात्री जागरण करून कथापुराणश्रवण, नृत्यगायन करतात.
  • दुसऱ्या दिवशी देवाचे पूजन करून विसर्जन करतात.
  • नंतर आचार्याला ती प्रतिमा, घट व वस्त्रे दान देतात.

घटदानमंत्र

नमो नमस्ते गोविन्द बुधश्रवण संज्ञकः |अद्यौघसंक्षयं कृत्वा सर्व सौख्यप्रदोभव || प्रीयताम् देवदेशोमम संशय नाशनः ||

  • एका ब्रह्मचाऱ्याला भोजन घालून दंड, छत्र, कमंडलू आदी दान करतात व दहीभाताचे भोजन घालून कर्मसमाप्ती करतात.
  • व्रतराज या ग्रन्थानुसार दीर्घायुष्य, पुत्रसंतती, राजैश्वर्य यांची प्राप्ती असे याचे फल सांगितले जाते

उद्यापन

  • बारावर्षे व्रत केल्यावर याचे उद्यापन करतात.
  • ज्यामध्ये भगवान वामनाची बारा अंगुले उंच अशी सुवर्ण, रजत वा ताम्र धातूची चतुर्भुज मूर्ती तयार करून तिची यथासांग पूजा करतात. दुसऱ्या दिवशी समिधा, तीळ, आज्या इ. द्रव्यांनी होम करतात व या मंत्राने हिचे दान देतात.

मूर्तीदानमंत्र

वामनः प्रतिगृह्णाति वामनोऽहं ददामि ते |वामनं सर्वतो भद्रं द्विजाय प्रतिपादये ||

महत्व

  • एकादशी, द्वादशी व श्रवण नक्षत्र एकत्र आल्यास यास ‘विष्णूशृंखल योग’, असेही म्हणतात.
  • वैष्णव संप्रदायात एकादशीचे महत्व असून काही ठिकाणी यासह द्वादशी असे दोन दिवसही उपवास करतात.
  • आषाढी एकादशीस देवशयनी’ असे म्हणतात तर या एकादशी योगास ‘परिवर्तन’ (कुशीस वळणे), असे म्हणत असून यावेळी ‘श्री विष्णू परिवर्तनोत्सव’ साजरा करतात व अशी प्रार्थना करतात, “ॐ वासुदेव जगन्नाथप्राप्तेयं द्वादशी तव | पार्श्वेन परिवर्तस्व सुखंस्वपिहि माधव ||
  • कुटुंब, व्यवसाय, नोकरी यासोबतच आपल्या दुर्गतीचा परिहार या प्रार्थनेने व योगाने होतो असे सांगितले जाते.
  • भगवान वामनाच्या प्राचीन ‘वामन’ व ‘विराट त्रिविक्रम’ अशा दोन स्वरूपातील मूर्ती कलकत्त्याच्या आशुतोष’ व ‘ढाका’ येथील संग्रहालयात पहावयास मिळतात.

देवेश्वराय देवाय देवसंभूतिकारणे | प्रभवे सर्वदेवानां वामनाय नमो नमः ||”

3 thoughts on “वामन जयंती”

  1. गौरव दशसहस्त्र

    देवेश्वराय देवाय देवसंभूतिकारिणे । प्रभये सर्व देवानां वामनाय नमो नमः ||
    छान माहिती धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *