हरतालिका

सणाचे नाव : हरतालिका
तिथि : भाद्रपद शु. तृतीया

कला काष्ठा मुहुर्तापि द्वितीया यदि दृश्यते |
सा तृतीया न कर्तव्या कर्तव्या परसंयुता |
केवलक्षय वशादभावे द्वितीया युक्ता ग्राह्या ||

पूजा साहित्य

१)हळदकुंकू पाळे   
२) फुले, दुर्वा, तुळस, बेल
३) नारळ, फळे    
४) विड्याची पाने, सुपारी, चिल्लर नाणी
५) कापसाची वस्त्रे  
६) पंचामृत, सौभाग्य वायन
७) चौरंग, वाळू, वस्त्र
८) धूप, दीप, निरांजन, नैवेद्य

पूजा मांडणी

  • वाळूचे लिंग तयार करून घ्यावे व चौरंगावर वस्त्र टाकून आसनासह ठेवावे. (हरतालिकेची मूर्ती असल्यास तीसुद्धा ठेवावी.)
  • यानंतर शक्य असल्यास पुरोहिताकडून अन्यथा पुढील श्लोकाने प्राणप्रतिष्ठा करावी

अस्यैः प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यैः प्राणाः क्षरन्तु च |अस्यै देवत्वमर्चायै मा महेतिच कच्चन ||

पूजा विधी

शास्त्रोक्त पद्धतीने प्रचलित पूजा विधि अशाप्रकारे,

  • वंदन : घरातील थोरामोठ्यांना तसेच कुलदेवतेस वंदन करून पुजेस बसावे.
  • आचमन / प्राणायाम : तीन वेळेस पळीने पाणी प्राशन करून चौथ्यांदा सोडावे व प्राणायाम  करावा.
  • देवतास्मरण : (हात जोडावे)

कुलदेवताभ्यो नमः| ग्रामदेवताभ्यो नमः| एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः| सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः|

  • संकल्प : (पळीत पाणी घेवून सोडावे)

मम इह जन्मनि जन्मान्तरे च अखण्डित सौभाग्य पुत्रपौत्रादि वृद्धि दीर्घायुष्य प्राप्ति
प्रतिवार्षिक हरतालिका व्रतांगत्वेन श्रीउमामहेश्वर देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन षोडशोपचार पूजनं अहं करिष्ये |

  • यानंतर श्रीगणेश पूजन, कलश, पृथ्वी, कलश, शंख, घंटा व दीप पूजन करावे.
  • श्रीगणेश पूजन :

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ |निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा || श्रीगणेशाय नमः ||

  • पृथ्वी पूजन :

पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता | त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम् || भूम्यै नमः ||

  • न्यास विधि : विष्णवे नमः |”, असे १२ वेळा म्हणून डोक्यापासून पायापर्यन्त स्वतःची शरीर शुद्धि करावी.
  • कलश पूजन :

कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः |
मूले तत्रस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः || कलशाय नमः ||

  • शङ्ख पूजन :

त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे |
नमितः सर्व देवैश्च पाञ्चजन्य नमोस्तुते || शङ्खाय नमः ||

  • घण्टा पूजन :

आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसाम् |
कुर्वे घण्टारवं तत्र देवताव्हान लक्षणम् || घण्टायै नमः ||

  • दीप पूजन :

भो दीप ब्रह्म रूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः |
आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वान्कामान्प्रयच्छ मे || दीपदेवताभ्यो नमः ||

  • ध्यान : हातात अक्षता, बेल, फुले घेवून श्रीउमामहेश्वर देवतेचे पुढील श्लोकांनी   ध्यान करून अर्पण करावे.

पीतकौषेय वसनांहेमाभां कमलासनां | भक्तानां वरदां नित्यं पार्वती चिन्तयाम्यहम् ||
विधायवालुकालिङ्गं अर्चयन्तीं महेश्वरं | पुर्णेन्दु वदनौ ध्यायेत् हरितालीं वरप्रदाम् ||

  • इतर पूर्व उपचार : यानंतर श्री उमामहेमहेश्वराभ्यां नमः | असे प्रत्येकवेळी म्हणून आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, पंचामृतस्नान, गंधोदक स्नान, मांगलिक स्नान, शुद्धोदक स्नान इत्यादी सर्व फुलाने सिंचन करीत करावे.
  • पुर्वपूजन : यानंतर पुर्वपूजना करिता फुलं वाहून धूप – दीप व उर्वरित पंचामृताचा नैवेद्य दाखवावा व वाहिलेली फुले (निर्माल्य) काढून अभिषेक करावा.
  • अभिषेक : (फुलाने जलसिंचन करीत अभिषेक करावा.) यावेळी शिवस्तुती पर महिम्न आदी स्तोत्रांचे पठण करावे.
  • उत्तर पूजन : पुनः श्री उमामहेमहेश्वराभ्यां नमः| या श्लोकाने यज्ञोपवीत, कापसाचे वस्त्र, गंध, अक्षत, फुले, हळद-कुंकू, अलंकार आदी उपचार करावे. तसेच वायन देवासमोर ठेवावे.
  • अंग पूजा : हातात अक्षत (पांढरी) घेवून देवतेच्या चरणापासून ललाटापर्यंत अवयवांना चौदा ठिकाणी अर्पण कराव्या. (“श्री उमामहेमहेश्वराभ्यां नमः|”)
  • पत्र पूजा : साधारणतः अशोक, आवली, दुर्वा, कण्हेर, कदंब, ब्राह्मी, धोतरा, आघाडा इत्यादी विविध १६ पत्री वाहिल्या जातात.
  • पुष्प पूजा : चाफा, केवडा, कण्हेर, बकुळ, धोतरा, सुर्यकमळ, कमळ, जास्वंद, मोगरा आदी विविध फुले अर्पण केली जातात. तसेच पाच वा सोळा बिल्वपत्रे वाहिली जातात.
  • यानंतर धूप, दीप, नैवेद्य, विडा – नारळ, दक्षिणा तसेच आरती, कापुर-आरती व मंत्रपुष्पांजली, प्रदक्षिणा, नमस्कार समर्पित करावा.
  • अर्घ्यप्रदान : उजव्या हातात गंध, अक्षत, पुष्प, सुपारी, नाणे घेवून त्यावर जल सोडून पुढील प्रत्येक श्लोकांद्वारे एक असे तीन अर्घ्य द्यावे.

शिवरूपे शिवे देवी शङ्कर प्राणवल्लभे | उमे सर्वार्थदे देवी गृहाणार्घ्यं नमोsस्तुते || १ ||
नमोस्तुते मृडानीश अपर्णा प्राणवल्लभा | भक्त्यानीतं मयाह्रीदं गृहाणार्घ्यं नमोsस्तुते || २ ||
व्रत संपूर्ति सिध्यर्थं यथाशक्ति मयाहतम् | आलिभिः सहिते देवी गृहाणार्घ्यं नमोsस्तुते || ३ ||

  • प्रार्थना :

हरतालिके नमस्तेस्तु सशिवे भक्तवत्सले | संसारभय भीताहं त्वमेव शरणं मम ||

  • समारोप : (पळीभर पाणी सोडावे.) अनेन यथाज्ञानेन कृत पूजनेन तेन श्रीउमामहेश्वरौ देवताः प्रीयेताम् |
  • यानंतर बऱ्याच ठिकाणी पुरोहितांना ‘वायन’ देतात व दुसऱ्या दिवशी दहीभात आदीचा नैवेद्य दाखवून पूजा विसर्जन करतात.

संदर्भ व महत्त्व

  • भगवान शंकराच्या “पती” म्हणून प्राप्तीसाठी पार्वतीने हे व्रत केले असे पुराणामध्ये उल्लेखित आहे.
  • “सायासव्रत फलप्राप्ती” म्हणून याच व्रताचा उल्लेख श्रीशंकरांनी केला असून पार्वतीस हे व्रत सांगितले.
  • सर्व साधारण कुमारिका व सुवासिनी यांनी हे व्रत करावे अशी पद्धती चालू असल्याचे दिसून येते.
  • हरतालिका पूजा ही सखी सहित उमामहेश्वराची केली जाणारी आराधना होय. भगवान पार्वती परमेश्वर एकच म्हणून सामुदायिक उपासना ठरते.