नागपंचमी

सणाचे नाव : नागपंचमी
कालावधी : श्रावण शु. पंचमी

श्रावणेपञ्चमी शुक्ला संप्रोक्ता नागपञ्चमी |
चतुर्थीसहितां त्यत्क्वा ग्राह्या षष्ठीसमन्विता ||

नागपूजेचे संदर्भ

  • तैत्तिरीय संहितेमध्ये अश्वमेध वर्णन प्रसंगी लोहीताही व वायस या नागांचे पूजन करावे असे सांगितले आहे. (५.५.१३.१)
  • शतपथ ब्राह्मणात नागमाता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतिक मानून पूजनीय ठरविले आहे.(३.६.२.२)
  • पौराणिक साहित्यामध्ये शिवाला नागकुलभूषण तर वैष्णव पुराणात विष्णूला अनन्तशयन किंवा शेषशायी असे म्हटले आहे

सणाची देवता : नागदेवता

संक्षिप्त पूजाविधी :

  • या दिवशी अभ्यंगस्नान करून शुचिर्भूत व्हावे.
  • हळदीने किंवा रक्तचन्दनाने (वा गंध,हळद,कुंकू मिश्रित) पाटावर किंवा भिंतीवर पाच फण्यांच्या नागाचे चित्र काढावे. भिंतीवर शक्य नसल्यास कोरा कागद घेवून त्यावर चित्र रेखाटून त्यावर पूजन करू शकता.
  • काही ठिकाणी नव नागांच्या आकृत्या रेखाटतात तर काही ठिकाणी नागांसह नागपत्न्याही चितारतात.
  • नागदेवतेचे ध्यान करताना नवनाग स्तोत्र म्हणावे –

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलम् |
धार्तराष्ट्रं शङ्खपालं तक्षकं कालियं तथा ||
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् |
सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ||

  • यानंतर गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी. पूजा करताना असे म्हणावे – अनन्तादि नागेभ्यो नमः |
  • आपल्या कुलाचारा प्रमाणे फुले, दुर्वा, लाह्या इत्यादि देवतेस वहाव्यात. काही ठिकाणी दुध व लाह्यांचा नैवेद्य दाखवितात.
  • आपल्या कुलाचाराप्रमाणे तळणाचे पदार्थ, उकडीचे पदार्थ, नऊ कारंजी / पाती इत्यादींचा फुलोरा करावा.

संकेत

नागपंचमीची कहाणी व अन्य काही कथा यांतून भारतीय लोकमानसाने काही संकेत केलेले दिसून येतात ज्यामध्ये या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, दिंड-मोदकासारखे उकडीव पदार्थ करावे, कुणाचीही हिंसा करू नये यांचा समावेश दिसून येतो.

  • संपूर्ण पूजा संपन्न झाल्यावर अशी प्रार्थना करावी

श्रावणे शुक्ल पञ्चम्यां यत्कृतं नागपूजनम् |
तेन तृप्यन्तु मे नागा भवन्तु सुखदाःसदा ||
अज्ञानाज्ज्ञानतो वापी यन्मया पूजनं कृतम् |
न्यूनातिरिक्तं तत्सर्वं भो नागाः क्षन्तुमर्हथ ||
युष्मत् प्रसादात् सफलां मम सन्तु मनोरथाः |
सर्वदा मत्कुले माsस्तु भयं सप्रविषोद्भवं ||

महत्त्व

  • यमुनेतून कालिया नागास वर काढून भगवान श्रीकृष्णाने गोपींसह याचे पूजन केले तो दिवस नागपंचमी होय.
  • ऐतिहासिक माहितीनुसार आर्य व अनार्य लोकांचा समन्वय झाला असता नाग लोकांना महत्व देवून त्यांची पूजा केली गेली, तो दिवस नागपंचमी होय.
  • काही ठिकाणी या दिवशी स्त्रिया व मुली गावाबाहेर नागाच्या वारूळावर किंवा देवळात जावून दुध, लाह्या वाहून नागाचे पूजन करतात.
  • भारतात विविध ठिकाणी नागक्षेत्रे आहेत जसे, काश्मीरमध्ये सुमारे सातशे ठिकाणी सर्पाकृती आढळतात, पंजाबात सफिदोन नावाचे सर्पपुजेचे केंद्र आहे, उत्तर प्रदेशात मथुरा, अहिच्छत्रा, वाराणसी इ. आहेत, वाराणसीत नागकुंवा आहे जिथे नागपूजन होते.
  • बंगालमध्ये नागमाता मनासा देवी सर्वत्र पूजिली जाते.
  • अशाप्रकारे नागदेवता व तिच्या पूजनाचे महत्त्व संपूर्ण भारतवर्षात पूर्वापार पहावयास मिळते.

9 thoughts on “नागपंचमी”

  1. पराग गुलाबराव चन्ने

    सुंदर माहिती दिलेली आहे. लहानपणापासून जे बघत आलोय त्यात पुन्हा ज्ञानात भर पडली आहे. अशीच माहिती प्रत्येक सणांची मिळावी जेणेकरून ह्या माहितीतून आजच्या पिढीला महत्त पटवून देऊ शकू.
    धन्यवाद.
    पराग गुलाबराव चन्ने
    ९८२३५८९२५९

  2. Rajashree Bhide.

    नागपंचमी बद्दल यातील फारच कमी माहिती होती. नागदेवतेची ठिकाणे तर माहितही नव्हती. आज ज्ञानात भर पडली. आभारी आहे.

  3. श्रीरंग वासुदेवराव Kurhekar

    मन:पूर्वक धन्यवाद !!!अत्यंत उपयुक्त अशी माहिती!!!!

  4. Mrunalini Rajesh Waghmare

    उत्तम नावीन्यपूर्ण संकलनात्मक माहिती

  5. Dhananjay Bansod

    आमचे कुलदैवत श्रीक्षेत्र भिलटेक या.चांदुर रेल्वे जि.अमरावती
    येथील श्री.शंभुषेश आहेत.

    कुळाचार म्हणुनच आम्ही नागपंचमी ची पुजा करतो.हा सण मला खूप आवडतो.

    तसेच नागदिवाळी सुद्धा नागपुजन करून आम्ही साजरी करतो.
    भिंतीवर पळसाच्या झाडाचे खोड जाळुन केलेल्या कोळसा यांचे नाग ९/९ लहान मोठे काढावे लागतात.कोळसा उगाळून घेऊन त्याने नाग काढावे लागतात.

  6. जितेन्द्र पलिये

    अत्यंत सुंदर माहिती, धन्यवाद.🙏

  7. सागर कैलास वक्टे

    अत्यंत सुंदर माहिती, धन्यवाद.🙏

  8. Rahul Chaudharkar

    Really good peace of knowledge. Thanks for upgrading the same. You people should right a book regarding all the festival’s. It will be beneficial for us.
    Thanks once again..

Comments are closed.