जन्माष्टमी / गोकुळाष्टमी

सणाचे नाव : जन्माष्टमी
तिथि : श्रावण वद्य अष्टमी

इयं निशीथ व्यापिनी पूर्वा वा परा ग्राह्या |
उभयेद्युनिशीथयोगे अभावे वा परैव ||
अस्यां रोहिणी नक्षत्र योगे बुध सोमवार योगेच फलातिशयः ||

अर्थात – श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत कृष्णाचा जन्म झाला म्हणूनच रोहिणी नक्षत्र किंवा सोमवार/बुधवार युक्त अष्टमी तिथीला जन्माष्टमीचे व्रत करतात.

सर्वसाधारण पूजा विधी

  • सप्तमीला एकभुक्त राहून अष्टमीला स्नानादी करून व्रताचा संकल्प करतात, “श्रीकृष्ण प्रीत्यर्थं सपरिवार श्रीकृष्णपूजां करिष्ये |
  • अष्टमीला सकाळी कुलाचार परंपरेनुसार पुरोहित आदींना बोलावून पवमानसूक्त आदिद्वारा अभिषेकपूर्वक श्रीकृष्णाचे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करतात.
  • यादिवशी उपवास करून देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात.
  • आज आपल्या घरी भगवंत प्रकटणार या भावासह घरात अखण्ड कृष्णस्तुति, रोषणाई करून मङ्गलमय वातावरणात मंचकावर एका बाजूला देवकी व कृष्ण तर दुसऱ्या बाजूला यशोदा, तिची कन्या, वसुदेव, नंद यांची स्थापना करतात.
  • महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गोकुळ करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये मृत्तिका मूर्ती करण्याचा प्रघात आहे. मूर्त्यांमध्ये राधाकृष्ण, सवंगडी, गाई, गोपी, तुळस इत्यादी बनवून त्यांची पूजा केली जाते.
  • काही ठिकाणी केवळ घरात प्रतिष्ठित असलेल्या मूर्तीला सजवून एक आरास करतात.
  • रात्रौ कथा, पुराण, नृत्य, गीत इ. कार्यक्रमांनी कृष्ण लीलांचे वर्णन करीत जागरण करतात आणि रात्रौ १२ वाजता जन्मसमय असल्याने श्रीकृष्ण चरित्राचे (जन्माचे) आख्यान करतानाच गुलाल, पुष्पे उधळून जन्मोत्सव साजरा करतात.
  • काही ठिकाणी “रेशमी वस्त्र” (कद), याचे पिळे करून गाठ न पाडता मूर्ती बनवून अलंकार चढवितात. मातृभावातून जन्मोत्सव, न्हाणोरा, पाळणा इत्यादी करतात.
  • यानंतर कुलाचार परंपरेनुसार पुरोहित आदींना बोलावून पवमान आदिद्वारा अभिषेकपूर्वक श्रीकृष्णाचे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करतात.
  • सर्व उपचार पूजन “ॐ नमो भगवते वासुदेवाय |”, या मंत्रोच्चाराने करतात.
  • पुनश्च श्रीकृष्णाला नूतन वस्त्रे घालावी व गंध, पुष्प, अलंकार, माला आदी अर्पण करतात.
  • यानंतर नामसंस्कार – कृष्ण कृष्ण असा जयघोष करतात
  • नैवेद्य – बरेचदा मिठाई वा सुन्ठोडा, पंजिरी, फळे इ. अर्पण करतात.
  • यानंतर आरती, मंत्रपुष्पांजली आणि प्रार्थना करतात.

दामोदराय विद्महे वासुदेवाय धीमही |
तन्नः कृष्णः प्रचोदयात् ||

प्रार्थना

योगेश्वराय देवाय योगानां पतये विभो |
योगेश्वराय नित्याय गोविन्दाय नमो नमः ||
यज्ञेश्वराय यज्ञाय तथा यज्ञोद्भवाय च |
यज्ञानां पतये नाथ गोविन्दाय नमो नमः ||
विश्वेश्वराय विश्वाय तथा विश्वोद्भवाय च |
विश्वस्य पतये तुभ्यं गोविन्दाय नमो नमः ||

  • यानंतर पाळण्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यास ठेवतात.
  • दुसऱ्या दिवशी दही, पोहे, लाह्या, लोणचे एकत्र करून काल्याचा नैवेद्य अर्पण करतात.
  • काही ठिकाणी नवमीला अभिषेकादि पूजन करतात.
  • या व्रताचे संतती, संपत्ती व अंती वैकुंठलोक प्राप्ती असे फल सांगितले जाते. (व्रतराज)

विशेष उत्सव पद्धती

  • यदुवंशी लोक मूळपुरुष म्हणून श्रीकृष्णाची पूजा करतात तर महानुभाव पंथीय जन्माष्टमी उत्सव करतात.
  • कित्येक वैष्णव दिपाराधना, पालखी, दोलोत्सव (वृंदावन), कृष्णलीलेचे खेळ, भागवत वाचन,कीर्तन, भजन, नृत्य-गायन इ.द्वारे (श्रावण कृ. प्रतिपदा ते अष्टमी) आठ दिवसांचा उत्सव करतात.
  • महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला करतात. “गोविंदा आला रे आला | गोकुळात आनंद झाला ||”, असे गीत गात लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंड्या फोडतात.

पौराणिक इतिहास

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||

  • स्वायंभुव मनु काळात अति तपस्वी सुतपापुण्यवती पृश्नी यांचे पोटी “पृश्निगर्भ” म्हणून धर्म स्थापनेकरीता भगवान अवतीर्ण झाले. प्रत्येक अवतारात आम्हीच माता-पिता असावे असा वरदेखील यांनी प्राप्त केला.
  • पुढे यांनीच कश्यप आणि अदिती म्हणून जन्म घेतला, ज्यांच्या पोटी भगवान “उपेंद्र” (वामन अवतार) म्हणून अवतरीत झाले.
  • द्वापार युगात पुनः वसुदेव आणि देवकी ह्यांचे पोटी “भगवान श्रीकृष्ण” अवतीर्ण झालेत.
  • आणि या दिवशी साजरा करण्यात येणारा उत्सव हा याच भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव होय.

उपास्य – उपासक भाव व उपासना पद्धती

नानाविध भक्त संप्रदाय हे प्राचीन इतिहासात होवून गेलेल्या कृष्ण उपासनांच्या आधारे आपल्या विशिष्ट भावातून कृष्णसेवा करतात. हे विविध भाव व त्यांचे आदर्श असे विषद करता येतील

  • मातृभाव – यशोदा, देवकी
  • गोपीभाव – गोप-गोपी (रासपूजन)
  • पत्नीभाव – संत मीराबाई
  • शिष्यभाव – अर्जुन
  • भक्तभाव – उद्धव
  • सखाभाव – सुदामा

भगवान श्रीकृष्ण – “कृष्णस्तु भगवान स्वयम् |

  • यास विष्णूच्या दशावतारातील आठवा अवतार म्हणून “पूर्णावतार” असेही म्हणतात.
  • छान्दोग्योपनिषदात घोर आंगीरसाचा शिष्य देवकीपुत्र श्रीकृष्णांचा उल्लेख येतो.(३.१७.४.६)
  • महाभारतात गर्ग्य आणि सांदिपनी शिष्य श्रीकृष्णांचा उल्लेख यतो, ज्यांनी अर्जुनास “श्रीमद भगवद्गीता” सांगितली.
  • गोपालकृष्णाच्या बाललीलेचे संदर्भ अश्वघोषाच्या बुद्धचरितात आढळतात,

णच्चणसलाहणणिहेण पासपरिसंठीआ णिउणगोवी |
सरिसगोविआणे चुम्बई कवोलपडीमागअकेण्हम् ||
(गा.स. २.१४)
अर्थात – नाचण्याच्या श्रमांमुळे गोपींना घाम आला होता. त्यांच्या ओल्या गालांवर कृष्णाच्या प्रतिमा उमटल्या होत्या

  • ब्रह्मसंहिता नामक ग्रंथात ही केवळ देवता नसून हे सर्वत्र व्यापक तत्व असल्याचे सांगण्यात येते. “अण्डान्तरस्थ परमाणु चयान्तरस्थं |” – अणु रेणुमध्ये व्याप्त असा.
  • वारकरी संप्रदायात “वासुदेव हरी” अशी घोषणाच दिसून येते.
  • कृष्ण आणि त्याचे मूल रूप विष्णू यांची उपासना तंत्रग्रंथातही आढळते जेथे यांस “स्वाधिष्ठान” चक्राची देवता मानले आहे.
  • याशिवाय स्वामी नारायण, महानुभाव, चैतन्य, राधावल्लभ, निम्बार्क, वल्लभ अशा अनेक संप्रदायांचे आराध्य भगवान श्रीकृष्ण असल्याचे दिसून येते.
  • संस्कृत व्याकरणग्रंथ पाणिनीय अष्टाध्यायीमध्येवासुदेवार्जुनाभ्यां वुञ्” असे सूत्र होय.
  • भारतवर्षात आजहि रूपगुण, साहस-पराक्रम, रीति-नीति, ज्ञान-तेज, व्यवहार-तत्त्वज्ञान, निःस्वार्थ राजकारणी व थोर वक्ता, कर्म-कर्तव्य, प्रेम-करुणा इत्यादि अनेकानेक वैशिष्ट्यांचा आदर्श म्हणून कृष्णचरित्राचे अध्ययन भगवत्स्वरुपात पूजन केले जाते.
  • भगवन श्रीकृष्णानी दिलेल्या गीतोपदेशा चे स्मरण करून त्यांना वंदन करूया,

“सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ||”

3 thoughts on “जन्माष्टमी / गोकुळाष्टमी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *