उत्सवाचे नाव : दीपावली
उत्सवकाल : आश्विन कृ. १२ ते कार्तिक शु. २
भारतीय संस्कृतीमधील महत्त्वाचे पर्व म्हणजे दीपावली उत्सव होय. हा उत्सव तेजाची आराधना म्हणून पणत्या, दिवे आदींच्या प्रकाशाने व रोषणाई करून द्वादशी ते द्वितीये पर्यंत साजरा केला जातो. यावेळी घराची स्वच्छता, रंगरंगोटी आदी करून नवीन वस्त्रे परिधान केली जातात. हे पर्व साधारणतः वसुबारस ते भाऊबीज पर्यंत असल्याचे दिसून येते.
वसुबारस
आश्विन कृ. द्वादशी हीच “गोवत्स द्वादशी वा वसुबारस” म्हणून प्रसिद्ध आहे. यादिवशी सवत्स धेनूचे पूजन करून दीपावलीचा शुभारंभ केल्या जातो. काही ठिकाणी गुळ-बाजरी, बेसन-भाकरी यांचा नैवेद्य दाखविल्या जातो.
हिवाळ्याची चाहूल लागताच शरीरात ऊबनिर्माण करण्याचे महत्वाचे कार्य या धान्याद्वारे केले जात असल्याचे पहावयास मिळते.
धनत्रयोदशी
अश्विन कृ. त्रयोदशी म्हणजेच “धनत्रयोदशी वा धनतेरस” होय. यादिवशी आयुर्वेदाची देवता भगवान धन्वंतरींची प्रार्थना व पूजन केले जाते. निरोगी व उत्तम जीवन जगण्याचे ज्ञान आयुर्वेदाद्वारे व त्याचे जनक यांचे पुजनाद्वारे साध्य केले जाते.काही ठिकाणी विशेषतः व्यापारी वर्ग हा धनाची पूजा करतो व धने-गुळ यांचा नैवेद्य दाखवितो.
यादिवशी सायंकाळी कणिक-हळद एकत्र करून त्याचा एक दीपक केल्या जातो व तो अंगणात दक्षिण दिशेस ठेवून यमदेवतेस अर्पण केल्या जातो.आपल्या कुटुंबातील सर्व लोकांचे क्षेम-कल्याण व्हावे, अपमृत्यू होवू नये याकरिता पुढील श्लोकाने यमदीपदान केले जाते.
मृत्युनां पाशदण्डाभ्यां कालेन श्यामयासह |त्रयोदश्यां दीपदानत्सुर्यजः प्रियतां मम ||
नरक चतुर्दशी
देशोदेशींच्या कुमारिकांना आपल्या बंदिशाळेत ठेवणाऱ्या नरकासुर दैत्याचा वध करून भगवान श्रीकृष्णाने सर्वांना अधर्मी जाचातून मुक्त केले, तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी होय.
या दिवशी सुगंधी तेल, उटणे आदी लावून औक्षण इ. द्वारे अभ्यंगस्नान करावे. देवतापूजन करून फराळाचा भोग देवास अर्पण करावा व अधिकाधिक गायत्री मंत्राचा जप करावा. सायंकाळी घरात/अंगणात पणत्या लावून रोषणाई करावी.
लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपुजादौ प्रदोशव्यापिनि अमावस्या ग्राह्या |
या दिवशी अभ्यंगस्नान नाही. बळीराजाने सर्व देवांना व लक्ष्मीला कोंडून ठेवले. भगवान नारायणाने त्रिपाद भूमीचे दान मागून सर्वांची सुटका केली.
लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ पैश्याचे नाही तर धन, धान्य, संपत्ती, विद्यारूपी संपत्ती (लेखणी-वही,रोजनिशी इ.) यांचे पूजन होय.
पुजनविधी
- चौरंगावर तंदुराची रास ठेवून सुवर्ण अलंकार मांडावेत.
- नवीन मातीची सात बोळके घेवून त्यामध्ये धान्य भरावे.
- पूजेत नवीन वही, लेखणी व दौत ठेवावी. काही ठिकाणी मातीची नवीन खेळणीही ठेवतात.
- सकाळी यांचे षोडशोपचार श्री महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती स्वरूपी पूजन करावे व नैवेद्य अर्पण करावा.
- प्रदोषकाली पुनश्च नूतन वस्त्रे परिधान करून पंचोपचार पूजन करावे.महानैवेद्य अर्पण करावा, तसेच तो झाकून दुसऱ्या दिवशी गोमातेस अर्पण करावा.
- सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा.
- लाह्यांद्वारे गृहशुद्धी करावी.
- यंत्र, वाहन, कोठीघर यांसह नवीन केरसुणीचे पूजन करावे.
- सर्व वडीलधाऱ्याना नमस्कार करून आनंदाने सण साजरा करावा.
बलिप्रतिपदा
बळीराजाने तीन पद भूमीचे दान केले. हे दातृत्व पाहून भगवान वामनाने “मी तुझा द्वारपाल होईल”, असे वचन दिले, तो दिवस म्हणजे “बलिप्रतिपदा” होय.हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असून यादिवशी शुभ संकल्प करावेत व त्यांचे आयुष्यभर पालन करावेत.
बहुतांश व्यापारी वर्ग हा दिवस नवीन वर्षारंभ म्हणूनही साजरा करतात. या दिवसापून विक्रम संवत सुरु होते. अभ्यंगस्नान करून बळी राजाचे त्याच्या स्त्रीसह चित्र काढून पूजन केले जाते.सायंकाळी मुली आपल्या पित्यास औक्षण करतात तर पत्नीही पतीस औक्षण करतात.
भाऊबीज
यमराजास त्याच्या बहिणीने भोजनास बोलाविले, त्याचा सत्कार केला तो दिवस म्हणजे यमद्वितीया होय. भाऊ-बहिणीचे अमर प्रेम हे या बीजेच्या माध्यमातून प्रकट होत असलेले दिसून येते.
या दिवशी भावास औक्षण करावे. ताटाभोवती रांगोळी काढून भोजन वाढावे. भावाने बहिणीस भेटवस्तू द्यावी. भाऊ नसल्यास चंद्राचे पूजन करावे.
नेपाळमध्ये हा सण “भाईटीका” या नावाने पाच दिवस करीत असल्याचे दिसून येते.