ज्येष्ठागौरी

उत्सवाचे नाव : ज्येष्ठागौरी
उत्सवाचा मुहूर्त : श्रावण शु. पक्षे अनुराधा, ज्येष्ठा व मूल नक्षत्र (अष्टमी तिथियुक्त )

मैत्रेणावाहये देवीं ज्येष्ठायां तु प्रपूजयेत् | मूले विसर्जये देवीं त्रिदिनं व्रतमुत्तमम् ||
यदाज्येष्ठा द्वितीयदिने मध्यान्हात्पूर्वम् समाप्यते | तदा पूर्वदिनमेव पूजनम् |
परदिने अपराण्हे स्पृशति तदा परैव ||

वैशिष्ट्य

 • या उत्सवात ज्येष्ठा / कनिष्ठा देवी व अपत्यप्राण यांची एकत्र पूजा करतात.
 • या पूजेमध्ये बऱ्याच विविधता दिसून येतात.
 • मातीचे मुखवटे तयार करून वा पिढीजात चालत आलेले मुखवटे आदींची दरवर्षी आरास करून, त्यांना अलंकृत करून गौरी (महालक्ष्म्या) उभ्या करतात.
 • काही ठिकाणी मडक्यांची उतरंडी करून त्यांना पोशाख व अलंकार आदी चढवून त्यांचे पूजन करतात.
 • दक्षिण भारतात काही ठिकाणी हा सण भाद्रपद शु. तृतीये पासून करीत असल्याचे ही पहावयास मिळते. येथे कणकीचे मुखवटे केले जातात.
 • काही ठिकाणी सुपामध्ये धान्यराशीवर मुखवटे ठेवून पूजन केले जाते.
 • कोकणात नदी / तलावातून वाळू आदींचे खडे आणून त्यांची स्थापना व पूजन केले जात असल्याचे पहावयास मिळते.
 • कोळी समाजात काही ठिकाणी ‘तेरडा’ वनस्पतीची रोपे आणून त्यामध्ये महालक्ष्मीचे स्थापना – पूजन केले जाते.

पूजन क्रम

सर्वसाधारणपणे हा उत्सव तीन दिवस साजरा केला जात असून हा नक्षत्र प्रधान मानलेला दिसून येतो

प्रथम दिन

 • यावेळी अनुराधा नक्षत्री गौरी देवीचे आवाहन करण्यात येते. घरातील सुवासिनी प्रमुख द्वारावर देवीचे मुखवटे घेवून उभे राहतात.
 • त्यानंतर सुवासिनीचे दुधाने पाद प्रक्षालन करतात व कुंकवाने ‘महालक्ष्मी पदचिन्ह’ काढून वाजत गाजत देवीला संपूर्ण घराचे दर्शन करवितात.
 • नंतर महालक्ष्म्या या आरास केलेल्या जागी मांडण्यात येतात.
 • यांना उभे करताना पायल्या किंवा मडकी वापरतात ज्या धान्याने भरलेल्या असतात.
 • काही ठिकाणी यानंतर भाजी – भाकरीचा (अंबाडी भाजी) नैवद्य सुद्धा दाखवितात.

द्वितीय दिन

ज्येष्ठा नक्षत्र असताना ‘गौरी पूजन’ हा सोहळा संपन्न होतो. याचा सर्वसाधारण पूजन विधी पुढीलप्रकारे विषद करता येईल

पूजन विधी

 • वंदन : घरातील थोरामोठ्यांना तसेच कुलदेवतेस वंदन करून पुजेस बसावे.
 • आचमन / प्राणायाम : तीन वेळेस पळीने पाणी प्राशन करून चौथ्यांदा सोडावे व प्राणायाम  करावा.
 • देवतास्मरण : (हात जोडावे)

कुलदेवताभ्यो नमः| ग्रामदेवताभ्यो नमः| एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः| सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः|

 • संकल्प : (पळीत पाणी घेवून सोडावे)

मम सकुटुंबस्य सपरिवारस्य अलक्ष्मी निरसनपूर्वक धनधान्य पुत्रपौत्र सौभाग्यादि अभिवृद्धिद्वारा श्रीज्येष्ठादेवी प्रीत्यर्थं भाद्रपद शुक्लपक्षे ज्येष्ठा नक्षत्रे यथाज्ञानेन यथाशक्ति यथामिलित उपचार द्रव्यैः षोडशोपचार ज्येष्ठादेवी पूजनं अहं करिष्ये |

यानंतर श्रीगणेश पूजन, कलश, पृथ्वी, कलश, शंख, घंटा व दीप पूजन करावे. तत्रादौ निर्विघ्नता सिध्यर्थं महागणपति स्मरणं शरीर शुध्यर्थं षडङ्गन्यासं पृथ्वी, कलश, शङ्ख, घण्टा पूजनं च करिष्ये |

 • श्रीगणेश पूजन :

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ |निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा || श्रीगणेशाय नमः ||

 • पृथ्वी पूजन :

पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता | त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम् || भूम्यै नमः ||

 • न्यास विधि : विष्णवे नमः |”, असे १२ वेळा म्हणून डोक्यापासून पायापर्यन्त स्वतःची शरीर शुद्धि करावी.
 • कलश पूजन :

कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः | मूले तत्रस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः || कलशाय नमः ||

 • शङ्ख पूजन :

त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृतः करे | नमितः सर्व देवैश्च पाञ्चजन्य नमोस्तुते || शङ्खाय नमः ||

 • घण्टा पूजन :

आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसाम् | कुर्वे घण्टारवं तत्र देवताव्हान लक्षणम् || घण्टायै नमः ||

 • दीप पूजन :

भो दीप ब्रह्म रूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः | आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वान्कामान्प्रयच्छ मे || दीपदेवताभ्यो नमः ||

 • आत्मशुद्धि: स्वतः वर व पूजा साहित्यावर शंख जल प्रोक्षण करावे.

शङ्खोदकेन पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षेत् |

प्राणप्रतिष्ठा विधी

आवाहित देवतेला उजव्या हाताने स्पर्श करून म्हणावे,

अस्यैः प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यैः प्राणाः क्षरन्तु च | अस्यै देवत्वमर्चायै मा महेतिच कच्चन ||
अस्यां मूर्तौ मम प्राण इह प्राणाः | अस्यां मूर्तौ मम जीव इह स्थितः ||

 • देवाला आरसा दाखवावा आणि गंध, फुलं, बालभोग (तूप-गुळ) अर्पण करावे.
 • पळीभर पाणी सोडावे, अनया पूजया अपत्यप्राण सहित श्रीज्येष्ठाकनिष्ठिका: प्रीयताम् |
 • अधिक विस्तृत विधीकरिता पुरोहिताचे मार्गदर्शन घ्यावे

पूर्वपूजन

 • ध्यान : हातात अक्षता, फुले घेवून पुढील श्लोकांनी ध्यान करून अर्पण करावे.

त्रिलोचनां शुक्लदन्तीं बिभ्रतीं काञ्चनीं तनुम् |विरक्ता रत्कनयनां ज्येष्ठां ध्यायामि सुन्दरीम् ||
अपत्यप्राण सहित श्रीज्येष्ठाकनिष्ठिकाभ्यां नमः || ध्यानं समर्पयामि ||

 • पूर्व उपचार : यानंतर “अपत्यप्राण सहित श्रीज्येष्ठाकनिष्ठिकाभ्यां नमः ||”असे प्रत्येकवेळी म्हणून किंवा “श्रीसुक्ताचे प्रत्येक ऋचेने”आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, पंचामृतस्नान, गंधोदक स्नान, मांगलिक स्नान, शुद्धोदक स्नान इत्यादी सर्व उपचार फुलाने सिंचन करीत अर्पण करावे..
 • धूप, दीप, नैवेद्य : यानंतर पुर्वपूजना करिता फुलं वाहून धूप – दीप व उर्वरित पंचामृताचा/ तुपसाखरेचा नैवेद्य नैवेद्य दाखवावा.
 • पुर्वपूजन समारोप : पळीभर पाणी सोडून वाहिलेली फुले (निर्माल्य) काढून अभिषेकाकरिता नवीन फुलं वहावीत.
  अनेन पुर्वाराधनेन अपत्यप्राण सहित श्रीज्येष्ठाकनिष्ठिका: प्रीयताम् |
 • अभिषेक : (फुलाने जलसिंचन करीत अभिषेक करावा.) यावेळी श्री देवीस्तुतीपर श्रीसूक्त वा अन्य स्तोत्रांचे पठण करावे.
 • अंग पूजा : प्रत्येक अवयवावर / प्रत्येक नावानंतर देवीला अक्षत वहाव्यात.

लक्ष्म्यै नमः – पादौ पूजयामि ||, पद्मायै नमः – गुल्फौ पूजयामि ||
कमलायै नमः – जानुनी पूज. ||, क्षिराब्धितनयाय नमः –उरुं पूज.||
इन्दिरायै नमः – कटिं पूज. ||, मन्गलायै नमः – नाभिं पूज. ||
मन्मथवासिन्यै नमः – स्तनौ पूज.||, क्षमायै नमः – हृदयं पूज.||
हरिप्रियाय नमः – कण्ठे पूज. ||, उमायै नमः – नेत्रे पूज. ||
रमायै नमः – शिरं पूज. ||, श्रीमहालक्ष्म्यै नमः – सर्वाङ्गं पूज.||

 • पत्र पूजा : पुढीलप्रमाणे प्रत्येक नाम घेवून पत्री वहाव्यात. (नसल्यास पुष्प वा अक्षत वहावी.)

श्रीयै नमः – अगस्तीपत्रं समर्पयामि || (अगस्ती वृक्षपान)
श्रीलक्ष्म्यै नमः – केतकीपत्रं समर्प. || (केवड्याचे पान)
श्रीवनमालिकाये नमः – धत्तुरापत्रं समर्प.|| (धोत्र्याचे पान)
बिभिषणायै नमः – तुलसीपत्रं समर्प.|| (तुळशीचे पान)
शाकय नमः – अशोकपत्रं समर्प. || (अशोकाचे पान)
वसुमालिकायै नमः – भृन्गराजपत्रं समर्प. || (माक्याचे पान)
सूर्यायै नमः – किन्वपत्रं समर्प. || (केन्याचे पान)
पन्कजधारिण्यै नमः – पङ्कजपत्रं समर्प. || (कमळाचे पान)
मुक्ता हारसमप्रभायै नमः – दुर्वां समर्प. || (दुर्वा)
पुष्कारिण्यै नमः – जपापत्रं समर्प. || (जास्वंदाचे पान)
पिन्गलिन्यै नमः – बिल्वपत्रं समर्प. || (बेलाचे पान)
हेममालिन्यै नमः – चंपकपत्रं समर्प. || (चाफ्याचे पान)
इन्दिरायै नमः – अपामार्गपत्रं समर्प. || (आघाड्याचे पान)
जमदग्निप्रियाय नमः – ताडपत्रं समर्प. || (ताडाचे पान)
श्रीजगदात्र्यै नमः – नानाविधपत्राणि समर्प. || (इतर सर्व पाने)

उत्तर पूजन

 • पुनः अपत्यप्राण सहित श्रीज्येष्ठाकनिष्ठिकाभ्यां नमः ||” या श्लोकाने कापसाचे वस्त्र, गंध, अक्षत, फुले, हळद-कुंकू, हार, अत्तर इ. सुगंधी द्रव्य, अलंकार आदी उपचार अर्पण करावे.
 • आपापल्या प्रचलित कुलाचाराप्रमाणे वस्त्रे, पोती, धान्य-डाळी, पत्री आदी अर्पण कराव्यात.
 • काही ठिकाणी ‘फुलोरा’ लटकविण्याची प्रथा आहे तर काही ठिकाणी ‘कथली आंबील’ पूजन करतात.
 • यानंतर ओटी / वायन आदी दिले जाते.
 • नैवेद्यामध्ये घावन घाटले / पुरणपोळी / आंबील / सोळा-भाजी इत्यादी विविध पदार्थ कुलाचाराप्रमाणे केले जातात.
 • आरती व मंत्रपुष्प : यानंतर आरती व मंत्रपुष्पांजली, प्रदक्षिणा व नमस्कार अर्पण करावा,

महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि | तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ||”मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि ||

 • अर्घ्यप्रदान : उजव्या हातात गंध, अक्षत, पुष्प, सुपारी, नाणे घेवून त्यावर जल सोडून पुढील श्लोकाद्वारे अर्घ्य द्यावा.

ज्येष्ठे श्रेष्ठे तपोनिष्ठे ब्रह्ममिष्ठे सत्यवादिनी |इह्येहित्वं महाभागे अर्घ्यं गृह्य सरस्वती ||श्रीज्येष्ठागौर्यै नमः | इदं अर्घ्यं समर्पयामि ||

 • प्रार्थना : हात जोडून प्रार्थना अशी प्रार्थना करावी व तदनन्तर ब्राह्मण-सुवासिनी पूजन करावे.

त्वं लक्ष्मीस्त्वं महादेवी त्वं ज्येष्ठे सर्वदामरैः |पूजितोsसि मया देवी वरदाभव मे सदा ||

तृतीय दिन

मूळ नक्षत्री आवाहित देवतेचे विसर्जन केले जाते.

 • यावेळी आवाहित देवतेचे पंचोपचार पूजन केले जाते.
 • कुलाचाराप्रमाणे दहीभात / मुरडपोळी इ. नैवेद्य दाखविला जातो.
 • यानंतर कहाणी वाचून पोते (सूत्र) पिवळे करून त्यास सोळा गाठी पाडतात. प्रसादरुपी सूत्र सुवासिनी गळ्यात धारण करतात. काही ठिकाणी आश्विन पौर्णिमेपर्यंत हे धारण केले जाते.
 • ग्रामीण भागात देवते समोरील राशीचे ‘भोज’ घालण्याची पद्धती दिसून येते.
 • यानंतर पुढील श्लोकाचे उच्चारण करून आवाहित देवतेचे विसर्जन केले जाते,

ज्येष्ठे देवी समुत्तिष्ठ स्वस्थानं गच्छ पूजिता |ममाभीष्ट पदानार्थं पुनरागमहेतवे ||

संदर्भ व महत्त्व

 • अग्निपुराणामध्ये तसेच देवी भागवत (स्कंद ९.३८/३९) मध्ये ‘यमराज – सावित्री’ संवादात भाद्रपद शु. अष्टमी, ज्येष्ठा नक्षत्री ‘महालक्ष्मी / गौरी पूजनाचा’ उल्लेखही आढळून येतो.
 • काही अभ्यासकांच्या मते रजोगुणीयुक्त ज्येष्ठा गौरी ही ‘अलक्ष्मी’ होय जिचे पूजन प्रथम करतात तर कनिष्ठा ‘लक्ष्मी’ असून हिचे पूजन ज्येष्ठेनंतर करतात.
 • ही शिवपरिवारातील एक देवी असून ‘कनौज’ ला हिचे महापीठ आहे.
 • हिने असुरांपासून स्त्रियांच्या सौभाग्याचे रक्षण केले म्हणून ‘महालक्ष्मी गौरी पूजन’ सुरु झाले, असेही सांगण्यात येते.
 • चैत्र मासातही प्रतिपदा ते अक्षय तृतीये पर्यंत हिचे पूजन चालते.
 • संगीत पारिजात’ ग्रंथानुसार ‘गौरी’ ही पार्वतीची ‘रागिणी’ असून हिला संध्यासमयी गायिले जाते. (ऋषभ,धैवत कोमल बाकी सर्व स्वर शुद्ध.)

1 thought on “ज्येष्ठागौरी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *