पोळा / पिठोरी अमावस्या

सणाचे नाव : पोळा / पिठोरी अमावस्या
तिथि : श्रावण कृ. अमावस्या

श्रावणामावास्यायां प्रदोष व्यापिनां कार्यम्
दिनद्वये प्रदोषव्याप्तौ एकदेशव्याप्तौ परा |
परदिने प्रदोष व्याप्तभावे पूर्वाग्राह्या ||

पिठोरी अमावस्या

 • आषाढ अमावस्या ते श्रावण अमावस्यापर्यंत पिठोरी पटाचे पूजन केले जाते.
 • या कालावधीत जरा – जीवन्तीका पूजन, नागपंचमी, आदित्यराणुबाई, रक्षाबंधन आणि भक्तगौरव जन्माष्टमी व्रत आदींचा समावेश होतो.
 • कृष्णोपनिषद अनुसार भगवान शंकर हे श्रीकृष्णांचे सद्गुरू असून श्रीकृष्णांची ‘वेणू’ ही श्री शंकरांचे सान्निध्य स्वरूप होय. ‘वेणुवृक्ष’ हा आजही श्री शंकर भगवानांचे स्वरूप म्हणून पूजिला जातो. (श्रावणमास व कृष्णजन्माष्टमी योगाचे रहस्य येथे दिसून येते.)

पिठोरी अमावस्या पूजाविधी

 • तांदुळाचे (धान्यराशीचे) आठ – आठ (८*८)चे पुंजके करून चौसष्ठ योगिनी नामक देवतांचे आवाहन व पूजन केले जाते.
 • काही ठिकाणी भिंतीवर चित्रे काढून तर काही ठिकाणी पिठाच्या मूर्ती तयार करून पूजा करतात.
 • यानंतर खिरीचा नैवेद्य अर्पण करून वायनदान केले जाते. वायन दान करताना संतती कडे न बघता वायन दान करण्याचा प्रघात आहे.

वृषभ देवतेचे प्राचीन संदर्भ

 • श्रीशिवपंचाक्षर स्तोत्रात “श्रीनिलकण्ठाय वृषध्वजाय”, म्हणजेच महादेवांच्या ध्वजावर वृषभाचे चिन्ह असल्याचा संदर्भ येतो.
 • भागवतपुराण अनुसार वृषभ हे विष्णूचे अवतार आहेत आणि कृषी आदीद्वारे हे प्रजा पालनाचे कार्य पार पाडतात. म्हणूनच यांच्या पदस्पर्शाने जमीन सुपीक होते, असा शेतकऱ्यांचा भाव आढळून येतो.
 • शिवपुराणात येणाऱ्या ‘वृषवैष्य – भिल्ल’ कथानकानुसार श्रीशंकर गणांमध्ये “वृषभ” यास स्थान प्राप्त झाल्याचा उल्लेख दिसून येतो.
 • अथर्ववेदामध्ये (९.४) ‘वृषभयुक्त गायी आम्हाला लाभो’, अशी प्रार्थना दिसून येते.
 • याशिवाय ऋग्वेद, तैत्तिरीय संहिता, काठक संहिता, कृषिपाराशर आदि विविध प्राचीन ग्रंथांत वृषभ / बैल यांचे संदर्भ पहावयास मिळतात.

पोळा पूजन विधी

 • प्रत्यक्ष वृषभ / बैल असल्यास त्यांचे व नसल्यास मातीचे बैल / वाडबैल ही या सणाची मुख्य देवता होय, जिचे पूजन आज केले जाते.
 • या दिवशी देवतास्वरूप बैलांना कडून कामे केली जात नाहीत.
 • त्यांना स्नान घालून त्यांच्या पाठीवरील उंचवटयास तूप / हळद एकत्र करून लावतात, यास “हिंगुळ” असेही म्हणतात.
 • यानंतर त्यांची शिंगे रंगवून, पायात / गळ्यात घुंगरू बांधून, पाठीवर रंगीबेरंगी झूल चढवून, सुंदर माळा घालून त्यांना सजविले जाते.
 • संध्याकाळी त्यांची मिरवणूक काढून घरातील पुण्यवती बैलांना औक्षण करतात, त्यांचे यथोपचार पूजन करतात व प्रथेनुसार पुरणपोळी आदींचा नैवेद्य अर्पण करतात.
 • काही ठिकाणी ‘ठोंबरा’ (ज्वारीपासून तयार झालेला पदार्थ) नैवेद्यास म्हणून अर्पण करतात.  
 • पूजनानंतर हातातील राखी बैलास वाहण्याचा प्रघातही दिसून येतो.
 • यानंतर बहिण भावाला औक्षण करून भावाच्या पाठीवर काकडी फोडते व नंतरच काकडी खाते.

महत्त्व

 • यालाच ‘बेंदूर’ किंवा ‘बेंडर’ असेही म्हणतात.
 • शेतात भरपूर धान्य आणि गोठ्यात गोधनाची वृद्धी ही देशात समृद्धता आणते आणि याचा प्रमुख आधार म्हणजे बैल / वृषभ याविषयी कृतज्ञता व देवताभाव या सणा द्वारे व्यक्त होतो.
 • बैलाला मारू नये असे अथर्ववेद (९.४.१७)महाभारतात (शांती.२६२.४७) स्पष्टपाने सांगितले आहे.
 • हडप्पा व मोहेंजोदडो येथील उत्खननात बैलाचे चित्र असलेल्या मुद्रा सापडल्या, ज्या तत्कालीन संस्कृति ही वृषभपूजक असल्याचे दर्शवितात.
 • म्हैसूरजवळ ‘वसवनगुडी’ नावाचे बैलाचेच स्वतंत्र मंदिर आहे.
 • आजही शेतकरी आपल्या बैलावर मुला-माणसांप्रमाणे प्रेम करतो आणि सर्व प्राणीमात्रांवर दया व प्रेम भाव ठेवण्याची उत्तम व्यवस्था आपल्याला भारतीय संस्कृतीत “पोळा” या उत्सवातून पहावयास मिळते.

नन्दीश्वरो महातेजा नगेन्द्रतनयात्मजः |
सनारायनकैर्देवैः नित्यं अभ्यर्च वन्दितः ||

6 thoughts on “पोळा / पिठोरी अमावस्या”

 1. डॉ. प्रिया पेंढारकर

  अतिशय उत्तम माहिती…अनेक गोष्टी कळल्या..भारतीय संस्कृतीची वैज्ञानिकता अधोरेखित झाली.

 2. आपला पारंपरिक सण पोळा याबद्दल शास्रोक्त अतिशय छान माहिती

 3. Rahul Chaudharkar

  Very useful information… You all are doing great job. It’s a need of time that we all should get familiarise with our rituals. All the time you people provide very useful and valuable information. Keep guiding us in the same way. Congratulations and all the best for upcoming post.

 4. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सणाचे महत्व त्याची माहिती देऊन फार मोलाचे कार्य आपण करत आहात.आपल्या कार्यास शुभेच्छा.आपल्यासारख्या लोकांमुळे आणि संस्थांमुळे वैदिक सनातन संस्कृतीची नक्कीच पुन्हा भरभराट होईल.

Comments are closed.